top of page

फ्लॅंडर्स फिल्ड्स' या कवितेचा मुक्त अनुवाद


मृण्मय देहावलीं भोवती
बहरुन आली रक्त फुले
पहा सांगती इथेच निजले
पराक्रमांचे रुधिर धडे

नंद खगांचे मंद असे स्वर
विहरत जाती अजून गगनी
परी न कानी पडू देती त्यां
ज्वालामुखीसम लोह संगीनी

घटकेपूर्वी सुखे भोगीली
दिल्या घेतल्या प्रेमळ भाका
आता घेऊनी संचित सारे
मृत्यूशी हितगूजची न्यारे

परि न विसावा तुम्हा गड्यांनो
घ्या अमुचा हा सांगावा
रिपुरूधीराचे अर्घ्य हेची तव
ध्येय, नको कुठला कांगावा

वीर भांडले रक्त सांडले
तुम्हास त्यांची असुदे जाण
घ्या हाती शपथेची ज्वाला
ध्येय धीराची तुम्हास आण

होईल युद्ध फोल हे जाणा
किंचित जरी विस्मराल जाण
रक्त फुलांच्या शय्येखाली
अस्वस्थची राहील बलिदान


स्वैर अनुवाद - मकरंद केतकर , डॉ. आनंद पाध्ये
इनहर, पुणे.

bottom of page